Sunday, January 16, 2011

Pune by Varsha Raje

पुणं म्हणजे पुणं म्हणजे पुणं होतं
तुम्हीच सांगा पुण्यामध्ये काहीतरी का उणं होतं?

पूर्वीचं पुणं म्हणजे विद्येचं माहेरघर
पुणं म्हटल्यावर डोळ्यांसमोर गोखले, टिळक, आगरकर!
पेशवे, कर्वे, फडके आणि मराठी संस्कृती
लाल महाल, शनिवार वाडा व कुठूनही दिसणारी पर्वती

पेशवाई पुणं, एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिध्द
अहो, दारू, मांस, मच्छी दूरच, इथं अंड सुद्धा निषिद्ध
पुणं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला-संगीताचा उगम
तरुणाई साठी वरदान बंड गार्डन आणि मुळा मुठेचा संगम

पुणं म्हणजे गारांचा पाऊस, राजेशाही वाडे आणि घोडागाडी
छोटे छोटे टुमदार बंगले आणि सभोवताली शोभिवंत झाडी
नाकात नथ, केसांचा खोपा, लफ्फेदार शालू आणि पुरुषांची पगडी
साता समुद्रापार पोचलेली इथल्या चितळ्यांची बाकरवडी

ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम असे कितीक संत जाहले
गंमतशीर मारुतींनी पुणे शहर भरले
मुबलक भाज्या, स्वस्त फळे, फळांचा आगळा स्वाद
सारस बागेतल्या गणपतीच्या देवळात, घंटेचा घुमतो नाद

पुणं म्हणजे नव्हेत केवळ 'पुणेरी पाट्या'
अमेरिकेतल्या शिक्षणात आहे इथल्या मुलांचा मोठा वाटा
कर्मठ भासले तरी या मातीत चांगले modern विचारही रुजतात
रां परांजपे पासून कुटुंबनियोजन तर फुल्यांपासून झाली स्त्री-शिक्षणाची सुरवात

पुणं म्हणजे तिरकं बोलणं, रोखठोक भाषा
पुण्याच्या विद्वानांकडून सर्वांच्या मोठ्या आशा
पुणेकरांचे 'तत्वाचे' प्रश्न म्हणजे समोरच्याचं मरण
एकसष्ट सालच्या पुरात फुटलं पानशेत धरण

काळ बदलला, जग बदललं, पुणं त्याला अपवाद नाही
हॉटेल्स आली, मोल्स आले, सायकली आता दिसत नाहीत
मनात भाव नसला तरी दगडूशेठ पुढे लांबलचक रांगा
आताचे समाजसुधारक(?) पुतळ्यावरून करती दंगा

मराठी शाळा जिकडे तिकडे पडल्या आहेत ओस
इंग्रजीला डोनेशन देऊन प्रतिसाद भरघोस
जीन्स बर्मुडाच्या पोषाखाचे आता आले फॅड
आई बाबा जुने, म्हणे मम्मी आणि डॅड

पण काळाबरोबर बदलून धावण्यातच शहाणपणा असतो
नावं ठेवत थांबला तो जगासाठी संपला असतो
बद्लात सुख मानत गेलं तरच देश होईल महान
आपल्या गावाचा असावा नेहमी सर्वांना अभिमान
परंतु तरीही,
पुणं म्हणजे पुणं म्हणजे 'नवीन पुणं' असतं
आणि या 'नवीन' पुण्यात 'जुनं पुणं' बाकी उणं असतं

Labels:

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home