Saturday, December 04, 2010

Bandra + Vandre by Suni Deshpande

वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं
टेनिसच्या भाषेत........ अग्गासिकुलीन "आंद्रे" असतं

सिने नट- नट्यांचे हे गाव..,
साऱ्या भारतात प्रसिद्ध याचे नाव,
इथूनच घुमतो हिन्दुह्रीदय सम्राटांचा आदेश...,
बीकेसी, डायमंड मार्केट म्हणजे हा लक्ष्मीचाच प्रदेश...,
इथे रहावं हे सर्वांचा स्वप्नं असतं..,
वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

विंदा करंदीकर, मधुसूदन कालेलकर,
अनंत काणेकर, शान्ता शेळके वांद्र्याचेच तर होते..,
"हिरो बार" मध्ये एन. दत्ता नेहेमीच दिसत होते
केशव मेश्राम यायचे माझ्या घरासमोर भाजी घ्यायला,
अरुण दाते फिरायचे पाय मोकळे करायला,
असे माझे "वांद्रे" गाव कलासंगिताचे माहेरघर असतं
वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

"लकी"ची फर्मास बिर्याणी नि
"हायवे गोमंतक"चा झणझणीत मालवणी स्वाद,
"नुडल्स ओन्ली" किंवा "ओन्ली पराठाज" च्या खमंग डिशेस
"मेक डोनाल्ड" चा बर्गर किंवा अगदीच काही नसले तर
"धाबा अमृतसरी" चा भेजा मसाला
खावं काय असा प्रश्न पडावा अस सर्व "माहौल" असतं.
म्हणूनच म्हणतो गड्या...,
वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

एम. आय जी, ऑटर्स क्लब, एम. सी सी अस क्लबचं जाळ असतं
लहानांपासून, पेन्शनराम्पर्यंत पर्यंत प्रत्येकाचं हक्काचं ठिकाण असतं.
तरुणाई साठी भाव विश्व मोकळं करून देण्यासाठी बेंड-स्टेण्ड असतं
आणि धमाल आयुष्य जगणाऱ्यासाठी पुब्जच साम्राज्यही असतं.
अस असलं तरी कीर्तनाच्या कार्यक्रमाला ही
श्रोते मिळतील की नाही हे भय नसतं.....!
म्हणूनच ..........वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

लिंकिंग रोड पासून हिल रोड पर्यंत
चपला पासून ते ड्रेस मटेरीअल पर्यंत..,
खरेदी साठी काहीच कमी नसतं...!
चोखंदळ गिऱ्हाइका बरोबर......
तेवढ्याच इरसाल विक्रेत्याच द्वंद्व असतं!
साध्या भाज्या काय सगळी कडेच मिळतात.....,
पण इथे इम्पोर्टेड भाज्यानाही गिर्हाईक मिळतं
रस्त्यावरच्या इडली, डोसे, संदवीच, पाणीपुरी वगैरेच्या विक्रेत्यांसाठी..,
वांद्रे म्हणजे "स्वर्ग"च असतं..!
अस हे वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

माउंटमेरी ते मरिआई, विठ्ठल मंदिर ते जामा मशीद,
इकडे गुरुद्वारा तर तिकडे राम मंदिर.....,
पारशी कॉलोनी ते पाली व्हिलेज,
नौपाडा ते खेरवाडी......सर्व धर्माची देवस्थानच नव्हे तर
सर्व धर्माच्या लोकांची वसतिस्थाने असलेलं
हे अनोखं गाव असतं....!
"अल्टीमेटली" वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

ज्यांच्या वाडवडिलांची बक्खळ पुण्याई आहे त्यांचा इथे घर असतंच
पण ज्यांची नाही त्यांनाही हे गाव आपलसं करतं
म्हणूनच "क्वीन ऑफ सबर्ब्स" हा किताब मिरवतं...!
आणि एक सांगू ? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे "NES १९७५" चे जन्मस्थान असतं
म्हणूनच म्हणतो वर्षा ....वांद्रे म्हणजे वांद्रे म्हणजे वांद्रे असतं......!

Labels: