IPL Pune Team arrived

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ... शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.

ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....

१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्‍या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्‍या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्‍या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

p.s : I had got the above mail from one of the group forum. Ijust got a feedback as follows :
हे लिखाण श्री. छोटा डॉन यांचं आहे. त्याची लिंक. कृपया मूळ लेखकाला लेखनाचे श्रेय द्यावे ही विनंती.

Comments

Sanhita / Aditi said…
हे लिखाण श्री. छोटा डॉन यांचं आहे. त्याची लिंक.
http://chhota-don.blogspot.com/2010/03/blog-post_22.html
कृपया मूळ लेखकाला लेखनाचे श्रेय द्यावे ही विनंती.

Popular posts from this blog

10cc gulp and 24 hour high

Rabbit and Tortoise story in Marathi musical

Madhav Julian and Indiver -प्रेमस्वरुप आई and Zindgi Ka Safar